Shipping calculated at checkout.
अनेक तऱ्हांच्या विषमतेचं आव्हान घेऊन एकविसाव्या शतकाचा आरंभ झाला आहे. जगाला झालेल्या या विषमज्वरामुळे ही समस्या अधिक गडद होत आहे.
आर्थिक महामंदी व हवामानबदल यांसारखी महाकाय संकटं तसंच पाणी, शौचालय, शाळा, दवाखाना या मूलभूत सुविधांची वानवा अशा स्थूल आणि सूक्ष्म आव्हानांचा
एकाच वेळी सामना करताना सामान्य माणसाचं पेकाट मोडून गेलं आहे. काळाच्या ओघात नेते, अधिकारी व प्रसारमाध्यमं या सर्वांनी गरिबांना ‘डिस्कनेक्ट’ केलं आहे. ‘मी, मी आणि केवळ मीच!’ ही जगण्याची रीत झाली आहे. समाजाला, राष्ट्राला व जगाला हे ‘स्व-तंत्र’ तापदायक ठरत आहे.
या मार्गाने पुढे गेल्यास पर्यावरणाचा आणि पृथ्वीचा अंत अटळ आहे. समाजमनातील भूस्तरांच्या हालचालींचा वेग विलक्षण वाढला आहे. यापुढेही देशात व जगात मोठे सामाजिक भूकंप होण्याची चिन्हं दिसत आहेत.
पर्यावरणीय समस्यांचं स्वरूप जागतिक असून त्यांचं आव्हान मात्र सामाजिक व राजकीय आहे. आपला समाज काळानुरूप सुसंस्कृत व जबाबदार होत नसल्यामुळे संपूर्ण पृथ्वी धोक्यात आली आहे. हे विश्वाचे आर्त आहे.