Shipping calculated at checkout.
मला ‘अंडरट्रायल` अर्थात कच्चा कैदी म्हणून येरवडा जेलमध्ये काही
काळासाठी स्थानबद्ध केलं गेलं होतं. तत्पूर्वी आयपीएस अधिकारी
म्हणून आणि कायद्याचा विद्यार्थी म्हणून मी जेलला भेट दिली होती.
परंतु त्यावेळी न दिसलेले तुरुंगाचे अंतरंग मला कच्चा कैदी म्हणून
वावरताना दिसले. त्याचबरोबर तुरुंगातल्या इतर बंद्यांच्या एका
वेगळ्या भावविश्वाचं दर्शन घडलं. त्यातून कैदी जेलच्या कोंडवाड्यामध्ये
जगतात कसे, वागतात कसे नि रमतात कसे याचं वास्तव चित्रण शब्दबद्ध
करण्याचा प्रयत्न मी या ‘तुरुंगरंग`मध्ये केला आहे.
अर्थात माणूस गुन्हेगार का होतो आणि समाज म्हणून आपण त्याला
गुन्हेगारीपासून कसं परावृत्त करू शकतो हेही मला इथं सांगायचं आहे.
इतकंच नाही, तर तुरुंगात कैद्यांचं आयुष्य जसं पणाला लागतं तसंच
फौजदारी न्यायप्रक्रियाही कशी कैद होते याची स्पष्ट जाणीव करून
देण्याचाही माझा प्रयत्न आहे. वाचक म्हणून आपण माझ्या या पहिल्याच
पुस्तकाचं स्वागत कराल अशी आशा.
जेल आणि कैदी सुधारणा हा विषय तसा दुर्लक्षित राहिला आहे. जेल
सुधारणांसाठी कैद्यांची दुसरी बाजू ऐकणे आणि त्यांच्या मानसिक
स्थितीचा उलगडा करणे, हे अत्यावश्यक आहे. मला खात्री आहे की,
‘तुरुंगरंग` हे पुस्तक समाजात जागृती निर्माण करेल. किंबहुना प्रशासन
जेलकडे केवळ दंड देण्याची जागा म्हणून न पाहता कैद्यांची वर्तणूक
सुधारण्यासाठीचे एक साधन म्हणून बघेल आणि त्या अनुषंगाने नीती
आखेल.