Shipping calculated at checkout.
‘सर्जा’ हे एका बैलाचं आत्मकथन आहे. या आत्मकथनाची सुरुवात एका करुण प्रसंगाने होते. सर्जा, त्याचा जोडीदार राजा आणि त्यांची (विशेषत: सर्जाची) जोडीदारीण खिलारी यांची ताटातूट होते. त्यांच्या मालकाने दुष्काळामुळे आणि ते म्हातारे झाले म्हणून त्यांना विकलेलं असतं. त्या तिघांनाही एकाच टेम्पोमध्ये घातलेलं असतं; पण खिलारीला मध्येच उतरवलं जातं आणि सर्जा-राजाची रवानगी एका कत्तलखान्यात केली जाते. सर्जा कसाबसा तिथून निसटतो. सर्जाचं आधीचं नाव असतं शंभू; पण त्याचा मालक त्याला विकतो आणि दुसरा मालक त्याचं नाव ठेवतो...सर्जा. तिथेच त्याची राजाशी आणि खिलारीशी भेट होते. सर्जा आणि खिलारीमध्ये प्रेम निर्माण होतं. काही काळाने मालक सर्जा-राजा-खिलारी यांना विकून टाकतो. कत्तलखान्यातून पळालेल्या सर्जाची उपाश्या नावाच्या माणसाशी भेट होते. उपाश्या सर्जाला नंदीबैल करतो आणि पैसे मिळवायला लागतो. उपाश्याबरोबर भटकंती करत असताना अचानक एके दिवशी सर्जाची गाठ खिलारीशी पडते. कालांतराने सर्जा आणि खिलारीचं वय लक्षात घेऊन उपाश्या त्या दोघांना गाय-बैलांचा प्रेमाने सांभाळ करणाऱ्या एका संस्थेत नेऊन सोडतो. तर असं हे ‘सर्जा’चं भावपूर्ण आत्मकथन वाचनीय आणि मनाला भिडणारं आहे.