ही कादंबरी वाचून मनांत भाव-भावनांचा कल्लोळ होतो. देवादी देव इंद्रदेवांना बंदिस्त करणारा रावण अनेक ठिकाणी कुतूहल जागं करतो. नवनिर्मिती ही आनंद देत असते. रावण स्वतःच्या ताकदीच्या जोरावर एवढं मोठं साम्राज्य उभारतो. लंका निर्माण करतो. आयुर्वेदाचा गाढा अभ्यासक असलेला रावण हा व्यापारी, व्यावसायिक असतो. दर्शन, राज्यशास्त्र आदी विषयात पांडित्य मिळवूनही विध्वंसक, दुष्टच का? शिवतांडव स्त्रोत्र रचणारा, रुद्रवीणा, बुद्धिबळ, रावणसंहीता, कुमारतंत्र हे तयार करून ज्ञानार्जन करणारा रावण खलनायक कसा? असे कित्येक निरुत्तरीत प्रश्नांचे उत्तर या कादंबरीत भेटतात , पण काही रावणाच्या उदार अंतःकरणावर विचार करायला भाग पाडतात. इतिहासात अन्याय झालेल्या रावण या व्यक्तिरेखेला खऱ्या अर्थाने या लेखकाच्या न्याय बुद्धीने या कादंबरीत न्याय मिळवून दिला आहे – हीच खरी या लेखकांच्या साचेबद्ध लेखणीची किमया आहे. या त्यांच्या कल्पनेला सलाम आहे. रावणाला न्याय देणारी ‛रावण – राजा राक्षसांचा’ ही आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक असणारी, पिढीवर सकारात्मक परिणाम करणारी साहित्यकृती निर्माण झाली आहे.