Shipping calculated at checkout.
‘इन्फिडेल’ हे आयान हिरसी अलीचे पहिले पुस्तक. या वादळी आत्मकथनामुळे आयान अलीने साऱ्या जगात खळबळ माजवली. ‘नोमॅड’मध्ये तिने अमेरिकेत आल्यावर नव्याने आयुष्याला कशी सुरुवात केली त्याबद्दल लिहिले आहे. युरोपमधील कडव्या इस्लामी लोकांच्या जीवे मारण्याच्या धमक्यांपासून दूर, तिच्या आजूबाजूच्या जगातील संघर्ष आणि तिच्यामधील अंतर्गत संघर्ष, या साऱ्यापासून दूर जाऊन तिने नव्याने आयुष्याला सुरुवात केली. ही कथा शारीरिक आणि भावनिक स्तरावरील स्वातंत्र्याच्या प्रवासाची आहे. स्त्रीच्या आचारविचारावर बंधने घालणाऱ्या मागास जमातीतल्या स्त्रीचे रूपांतर एका खुल्या समाजातील स्वतंत्र आणि समानतेची भावना मनात असणाऱ्या नीडर स्त्रीमध्ये कसे झाले, त्याबद्दलचे हे अनुभवकथन आहे. तिने सांगितलेल्या वास्तववादी गोष्टींमधून तिला किती आव्हानांचा सामना करायला लागला, हे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत इस्लाममधील विरोधाभास दाखवणाऱ्या जीवनपद्धती आणि पाश्चिमात्यांची जगण्याची मूल्ये यांचा कुठेच मेळ बसत नाही, हे तिने दाखवून दिले. कुटुंबापासून दूर झाल्यावर आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक स्थित्यंतरांच्या गोष्टी आयान अलीने सांगितल्या आहेत. पाश्चिमात्य समाजात एकरूप होताना तिला पूर्वायुष्यातील गैरसमजुती, अंधश्रद्धा यांपासून स्वत:ला वेगळे करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचेही यात चित्रण आहे. वडील मृत्यूशय्येवर असताना झालेल्या भेटीचे हृद्य वर्णन यात आहे. ९/११च्या घटनेनंतर तिने इस्लामचा त्याग केल्यावर तिच्या वडिलांनी तिच्याशी संबंध तोडले होते. त्या पाश्र्वभूमीवर त्यांची अखेरची भेट मन हेलावून सोडते. त्यांच्याप्रमाणेच तिची आई, सोमालियातील आणि युरोपमधील इतर नातेवाईक या सर्वांपासूनच आयान दुरावली. ‘नोमॅड’ हे सांस्कृतिक संघर्षात वाताहात झालेल्या कुटुंबाचं चित्रण तर आहेच, पण त्याचबरोबर एका स्त्रीच्या अमेरिकेतील पदार्पणाचे तेथील हृद्य, काही वेळा मजेशीर अनुभवाचे, तिथल्या संस्कृतीचे, तिने केलेल्या विश्लेषणाचे चित्रण आहे.