2024ची लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरू शकते. जर नरेंद्र मोदी, पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ सलग तिसर्यांदा मिळवण्यात यशस्वी झाले, तर जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तिसर्यांदा पंतप्रधानपदी येणारे ते पहिलेच नेते असतील. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंतच्या या समग्र आणि व्यापक आढाव्यात मिन्हाज मर्चंट यांनी, मोदींनी पंतप्रधानपदी असताना भारतीय राजकारण, अर्थव्यवस्था आणि संस्कृतीला कसा आकार दिला, याचं मार्मिक विश्लेषण केलं आहे. या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी केलेल्या एकजुटीची रणनीती भाजपाचा विजयरथ रोखू शकेल का, याची चाचपणीदेखील या पुस्तकात करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि विरोधी पक्षांचं शासन असलेल्या राज्यांचे धुरंधर राज्यकर्ते आपापसातील मतभेद बाजूला सारू शकतील? 2012पासून मिन्हाज मर्चंट मोदींना अनेकदा भेटले, त्यांची मुलाखत घेतली. लेखकाने मोदींच्या भौगोलिक राजकारण, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि सामाजिक सुधारणा आदि मुख्य विषयांसंदर्भातील धोरणांचं विश्लेषण केलं आहे. 10 विस्तृत विभाग आणि 31 प्रकरणं असलेल्या या पुस्तकात मोदींच्या मागील दशकातील एका प्रादेशिक नेत्यापासून वैश्विक राजनेता बनण्यापर्यंतचा प्रवास साकारण्यात आला आहे.