Shipping calculated at checkout.
'सतीश आळेकर लिखित- दिग्दर्शित महानिर्वाण हे नाटक मराठी रंगभूमीवर अवतरले त्याला आज थोडीथोडकी नव्हे, तर पंचवीस वर्षे झाली. स्थल-काल-संस्कृतिविशिष्ट संदर्भ असलेले हे नाटक अन्य भारतीय भाषांत अनुवादित व मंचित झाले. अन्वयार्थाच्या अनेक शक्यता व क्षमता सुचविणा-या या नाटकाने अभ्यासकांना व रंगकर्मीनाही जणू एक आव्हान दिले. महानिर्वाणच्या आतापर्यंत झालेल्या समीक्षेतून व या नाटकाच्या प्रयोगाशी संबंधित असलेल्या मराठी तसेच परभाषक कलावंतांनी शब्दबद्ध केलेल्या निर्मितीच्या कहाण्यांतून याचा पुरेपूर प्रत्यय येतो. हास्याचे वेदनेत रूपान्तर करणारे हे आख्यान - महानिर्वाण – अजूनही पहिल्याइतकेच साग्रसंगीत, जोषात रंगते आहे आणि आताचे तरुण प्रेक्षकही त्याला पूर्वीइतकाच तन्मयतेने प्रतिसाद देत आहेत. अजूनही मृदंगावरची थाप तेवढीच कडकडीत पडते, हार्मोनियमचे सूर स्वच्छ-स्पष्टपणे उमटतात आणि नाटकाच्या अखेरीस येणारा देह जावो अथवा राहो हा तुकारामांचा अभंग आपल्याला व्याकूळ करतो. तिकडे रंगमंचावर लाल होत जाणा-या ज्वाळांनी वेढलेले भाऊ मरत असतात आणि त्या काही क्षणांत आपण रसरसून जगत असतो. असा अनुभव देणारी नाटके बहुधा अल्पच असतात. महानिर्वाण हे अशा नाटकांपैकी एक आहे. म्हणूनच समीक्षा आणि संस्मरणे या दोन्ही दृष्टींनी ते लक्षणीय ठरते. '