Shipping calculated at checkout.
महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्राने आज डेरेदार वटवृक्षाचा नेत्रदीपक आकार घेतला आहे. सहकाराच्या कडव्या विरोधकांनाही हे मान्य करण्यावाचून आज गत्यंतर उरलेले नाही. या सर्वदूर प्रगतीमागील मूलभूत तत्त्वज्ञानाचा शोध-बोध घेण्यासाठी आज जपान, इस्राएल, आफ्रिका येथील शिष्टमंडळे महाराष्ट्रात उतरताहेत. वारणानगर, अकलूज, कोल्हापूर, इचलकरंजी व प्रवरानगर अशा येथील अनेक सशक्त सहकारी केंद्रांना ही शिष्टमंडळे अभ्यासू वृत्तीने भेटी देताहेत. सहकाराची डोळस कास धरून महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाने निःसंशयपणे शेकडो वर्षांची एक कळकट कात आता टाकली आहे. अद्याप खूप वाटचाल तर करावयाची आहेच.
सर्वसामान्य शेतकऱ्याच्या व कष्टकऱ्याच्या खडतर जीवनमानाला पत व अर्थ प्राप्त करून देणाऱ्या या सहकारी वटवृक्षाचे बीजारोपण इ. स. १८९७ सालीच, ऐन पारतंत्र्याच्या अंधारयुगातच झाले! त्या वर्षीच, भारतातीलच नव्हे, तर अखिल आशियातील सर्वसामान्यांचा पहिला सहकारी साखरकारखाना उठविणारा सहकाराचा सच्चा, जिद्दी, क्रियाशील व अपार कष्टाळू उद्गता जन्माला आला. कोठे? तर बुद्रुक लोणी या सर्वस्वी आडगावात! कोण? महाराष्ट्रात गेल्या पिढीत घडून गेलेल्या आर्थिक आघाडीवरच्या एका अटीतटीच्या, चिवट व अंती यशमय झालेल्या ‘लढती’चा हा ललितसमृद्ध मागोवा! वातावरण, बोली-भाषा, व्यक्तिरेखांकन यांचा शिवाजी सावंत यांनी खास आपल्या शैलीत घेतलेला हद्य असा एक शोध-बोध.