Shipping calculated at checkout.
संत तुकोबाराय, गेली साडेचारशे वर्षे मराठी माणसाच्या मनावर अगदी सगळ्या जगभरातल्या मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे, अणू एवढ्या अस्तित्वापासून आकाशाएवढं महानपद मिळवणारे संत तुकाराम. माझी हेचि दान देगा देवा ही कादंबरी तुकोबांचा हाच अणू पासून आकाशापर्यंतचा जीवनपट अधोरेखित करते. तुकोबांवर अनेक प्रकाराने अनेकांनी लिखाण केलं. पण कादंबरी रुपातून तुकोबांच्या जन्मापासून ते वैकुंठ गमनापर्यंतच त्यांचं चरित्र आणि चारित्र्य ‘हेचि दान देगा देवा’ मध्ये मी शब्द बद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तुकोबांच्या जीवनातील विशिष्ट-विशिष्ट कालखंडावर खूपच लिखाण आहे. पण अणू पासून आकाशापर्यंतचा तुकोबांचा जीवन आलेख यात मला मांडायचा होता आणि तो मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मी संशोधक नाही. चिंतन आणि मनन करणारी विचारवंत, अभ्यासकही नाही. पण तुकोबांच्या भक्तीवर आणि त्यांच्यातल्या भक्तावर श्रद्धा ठेवणारी, तुकोबांचे अभंग विचारधन म्हणून वाचणारी नक्कीच आहे. आणि हीच माझी भावना ही कादंबरी लिहताना उपयोगी ठरली. तुकोबा भक्त म्हणून थोर होतेच, कवी म्हणूनही थोर होते पण त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून मी त्याचं माणूसपण ही शोधलं. खरंतर तेही सर्वश्रुतच आहे. पण त्यांच्या अभंगातून मला त्यांचं आणखी काही वेगळेपण दिसलं आणि मग ते अधोरेखित करण्यासाठी माझ्या कल्पना विश्वातून मी प्रसंग तयार करत गेले. याचं जाता जाता एक उदाहरण द्यायचंच झालं तर तुकोबांना संस्कृत येत होतं ही बाब सगळ्यांनी गृहीत धरली आहे. कारण तुकोबांचा वेदांचा आणि भगवद् गीतेचा अभ्यास होता हे त्यांच्या अभंगातून जाणवतं. पण त्या काळातील समाज व्यवस्था लक्षात घेता तुकोबा सहजपणे संस्कृत शिकले असतील असं वाटत नाही. मग त्यांना संस्कृत येत होतं हे अधोरेखित करण्यासाठी माझ्या कल्पना विश्वातून मी एक प्रसंग तयार केला आणि त्यात तुकोबा संस्कृत भाषा कुठं, कशी शिकले असावेत असा अंदाज बांधून तो प्रसंग लिहीला. हा प्रसंग कादंबरीत मुळातून वाचणं नक्कीच आनंददायी ठरेल. तुकोबांच्या व्यक्तीमत्त्वातील अशा अनेक पैलूंना साकार करण्यासाठी असे अनेक प्रसंग माझ्या कल्पना विश्वातून निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातूनच मग आवली सोबतचा त्यांचा संसार, त्या दोघांचं भावबंध, एक पती म्हणून, पिता म्हणून, मित्र म्हणून, संत म्हणून, समाजसेवक म्हणून तुकोबा कसे दिसले, वागले, बोलले असतील याला काल्पनीक आणि भावनिक रंग देऊन प्रसंग फुलवत गेले. हे करत असताना तुकोबांच्याच अभंगांनी मला प्रेरणा दिली. ते प्रसंग तसे घडले नसतील ही कदाचित पण ते कादंबरीत मांडताना तुकोबांचे अभंगच त्यांना (प्रसंगांना) प्रमाण ठरले हे तितकेच खरे. तुकोबांची ‘मऊ मेणाहूनि आम्ही विष्णूदास’ अशीच प्रतिमा आत्तापर्यंतच्या तुकोबांवरच्या बहुतेक सर्व साहित्यात उभी केलेली दिसते. (काही अपवाद वगळता) आणि ती योग्यच आहे. पण त्यांच्या ‘कठीण वज्रास भेदू ऐसे’ या शब्दांतला चांगुलपणातला कणखरपणा अभावानेच अशा साहित्यात आलेला दिसतो. तुकोबांच्या व्यक्तीमत्त्वातला हाच कणखरपणा या कादंबरीत मला दाखवायचा होता. त्यासाठी मग काही काल्पनिक प्रसंगाची गुंफण केली आणि तुकोबांच्या अभंगातले खरे तुकोबा उभे केले. ‘‘जो जे वांछिल तो ते लाहो।’’ या ज्ञानेश्वर माऊलीच्या विश्वकल्याणाच्या पसायदानानंतर हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।। हे तुकोबांचं विश्वशांतीचं मागणं हा आपल्या मराठी भाषेचा ललामभूत जागतिक वारसा आहे. या कादंबरीतून तोच वारसा जपण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या वाचकांना माझा हा प्रयत्न आवडेल या विश्वासानं ‘हेचि दान देगा देवा’ हे मागणं रसिकांच्या चरणी ठेवते आहे. वाचकांना ‘माझा विसर न व्हावा’ ही विनंती.