Out of Stock
Shipping calculated at checkout.
हेन्री डेव्हिड थोरो यांच्या ‘वॉल्डन’ किंवा ‘लाइफ इन द वूड्स’ या गाजलेल्या ग्रंथाचा ‘वॉल्डनकाठी विचार-विहार’ हा अनुवाद दुर्गा भागवत यांनी १९६५ साली केला होता. कालानुरूप काही बदलांसह या ग्रंथाची दुसरी आवृत्ती नुकतीच मॅजेस्टिक प्रकाशनातर्फेप्रसिद्ध झाली आहे. नव्या आवृत्तीच्या संपादक मीना वैशंपायन यांच्या प्रस्तावनेतील काही अंश..
‘मी रानात राहायला गेलो तो अशासाठी की जीवन हेतुपुरस्सर जगावे, जीवनाच्या मूलभूत तथ्यांना सामोरे जावे, जे इतरांना शिकवायचे ते आपल्या स्वत:ला शिकता येते की नाही ते पाहावे, आणि मरतेवेळी आपण जगलोच नाही, हे उमगू नये म्हणून. जे जीवन नव्हे ते जगण्याची मात्र मुळीच इच्छा नव्हती. जिणे किती प्रिय, किती किमती आहे.. मला अगदी खोल, गहन-गंभीर जीवन जगायचे होते.’
अमेरिकेतील एका लेखकाने- तेही पूर्णपणे मुक्त मानल्या गेलेल्या लेखकाने केलेले हे विधान लाखो लोकांना स्वत:च्या अंकित करते, आपले चाहते बनवते, त्यांच्यावर जादू करते, हा गमतीशीर विरोधाभास वाटावा. पण हा असा अभिजात उद्गार अशा कलात्मकतेने व्यक्त केला गेला, की त्याव्यतिरिक्त, त्यात जे सांगितले नाही ते काही अस्तित्वातच नाही असे वाटावे, किंवा जीवनाच्या अत्यावश्यक तथ्यांपासून दूर नेणारे वाटावे. पुन्हा या विधानाच्या भाषेचा पोत आणि त्यात अनुस्यूत असणारा विचार यात लवमात्र फरक वाटू नये. त्या लेखकाची हीच तर इच्छा होती. कधी तर असेही वाटते, की त्याने केलेल्या युक्तिवादापेक्षा त्याने ग्रंथात केलेली कलात्मक मांडणी आपल्याला अधिक आकर्षक वाटते आहे.
हा लेखक होता हेन्री डेव्हिड थोरो. एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध आणि अभिजात अमेरिकन लेखक म्हणून थोरोची गणना आज दीड-दोनशे वर्षांनंतरही केली जाते. त्याच्या ‘वॉल्डन’ या ग्रंथामुळे आणि त्याच्या दैनिकी (जर्नल्स)मधील लेखनामुळे तो जगातला एक अभिजात लेखक ठरला. असे म्हणतात, की अमेरिकेतल्या पहिल्या आठ श्रेष्ठ ग्रंथांपैकी एक म्हणजे ‘वॉल्डन’ होय. लाखो लोकांवर ज्याच्या विचारांचा व जीवनशैलीचा प्रभाव पडला, तो हा लेखक हेन्री थोरो कसा होता, त्याचा जीवनक्रम कसा होता, आपल्या केवळ पंचेचाळीस वर्षांच्या आयुष्यात त्याने एवढे मौलिक आणि विपुल लेखन कसे केले, हे पाहू जाता काही विलक्षण तथ्ये हाती येतात.
दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या विदुषीला वयाच्या पंधराव्या वर्षांपासून थोरोची वाचनसोबत असावी असे वाटू लागले होते आणि त्यांना ती सोबत आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सोडावीशी वाटली नाही. दुर्गाबाईंनी थोरोच्या ‘वॉल्डन’ या पुस्तकाचा अनुवाद केला तो ‘वॉल्डनकाठी विचार-विहार’ या शीर्षकाने ‘मॅजेस्टिक बुक स्टॉल’ प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला होता. त्याबरोबरच त्याच्या ‘Civil Disobedience, Walking’ यांसारख्या गाजलेल्या निबंधांचे व काही पत्रांचे अनुवाद दुर्गाबाईंनी केले, ते ‘चिंतनिका’ या शीर्षकाच्या पुस्तकात समाविष्ट आहेत. शिवाय त्यांनी ऑगस्ट डल्रेथ या लेखकाने लिहिलेल्या थोरोच्या चरित्राचाही (‘काँकॉर्डचा क्रांतिकारक’ या शीर्षकाने प्रसिद्ध असलेला) अनुवाद केला. यावरून त्यांच्यावर असणारा थोरोचा प्रभाव लक्षात येतो. ‘वॉल्डन’ या पुस्तकाच्या आरंभी दुर्गाबाईंनी लिहिलेले थोरोविषयीचे प्रस्तावनारूपी छोटेसे टिपण जरी वाचले तरी त्यांचा थोरोबद्दलचा आदरही आपल्याला जाणवत राहतो.
दुर्गाबाईंनी साठेक वर्षांपूर्वी केलेला ‘वॉल्डनकाठी विचार-विहार’ हा अनुवाद पूर्वी वाचलेला होता. आता त्या पुस्तकाच्या द्वितीयावृत्तीचे संपादन करताना मी थोरोबद्दल अधिक वाचत गेले. थोरोचे उल्लेख जेव्हा जेव्हा केले जातात, तेव्हा तेव्हा काही बाबी नेहमीच अधोरेखित होतात. थोरो आणि निसर्ग, थोरो आणि वॉल्डनचे तळे, थोरो आणि क्रांती, थोरो आणि कविता, थोरो आणि विजनवास, थोरोचे विपुल लेखन, सविनय कायदेभंगाबद्दलचे त्याचे विचार, महात्मा गांधी, मार्टनि ल्यूथर किंग, टॉलस्टॉय, मास्रेल प्रूस्त यांसारख्या जागतिक नेत्यांवरील व साहित्यिकांवरील थोरोचा प्रभाव, आणि रोजच्या जगण्यासंबंधी त्याने केलेले विविध प्रयोग! या आणि अशा आणखी इतरही गोष्टी ऐकताना, वाचताना या माणसाबद्दलचे माझे कुतूहल वाढत गेले. मुख्य म्हणजे लोकांचे तथाकथित मनोरंजन करणारे असे काहीही त्याने लिहिलेले नसून, आजही लोक आवडीने त्याचे लेखन वाचतात. दीडशे वर्षांनंतरही ते वाचावेसे का वाटते याविषयी मला जाणून घ्यावेसे आणि त्याविषयी वाचकांशी संवाद साधावा असेही वाटले.
एखादा अभिजात लेखक आपण एकदा वाचतो तेव्हा त्याच्या लेखनातील कितीतरी गोष्टी आपल्या नजरेतून निसटतात. तो लेखक आपल्याला पूर्णपणे समजला असे भासले तरी ते खरे नसते. पुन्हा पुन्हा त्याचे लेखन वाचले तर नवीन काही कळत जाते, हा आपला अनुभव! मीही असेच अनुभवले. ‘वॉल्डन’चे लोकांना एवढे आकर्षण अजूनही का, हे समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. ‘वॉल्डन’ दोन-तीन वेळा वाचले तरी प्रत्येक वेळी वेगळे काही लक्षात