Shipping calculated at checkout.
भारतीय चातुर्यकथा म्हटलं की बिरबल आणि तेनालीराम हीच नावं झटदिशी डोळ्यांपुढे येतात. या दोन्ही अत्यंत हुशार व्यक्ती इतिहासात अजरामर होऊन बसलेल्या आहेत. त्यातही बिरबलाच्या कथा तर अजूनही संदर्भासाठी वापरल्या जातात. अगदी इंटरनेटवर, मॅनेजमेंटच्या धड्यांमध्ये बिरबलाचं स्थान अव्वल असल्याचं दिसतं. अकबर बादशाह आणि बिरबल यांचं मेतकूट फारच खुमासदार जमलेलं आहे. अकबराच्या दरबारातल्या नऊ रत्नांपैकी बिरबल अकबराचा विशेष लाडका होता. बिरबलानं आपलं बुद्धिचातुर्य, हजरजबाबीपणा, सच्चेपणा, निर्भयता, शौर्य वगैरे गुणांच्या जोरावर बादशाहचं मन तर जिंकून घेतलं होतंच; पण देशविदेशांतही त्याची कीर्ती पसरलेली होती. बिरबल-बादशाहच्या कथा वाचताना करमणूक तर होतेच, पण बोधही मिळतो. शहाणपण मिळतं. शिकायला मिळतं. आपल्या देशात इतकं मौल्यवान रत्न जन्माला आलं, याचा अभिमानही वाटतो. या गोष्टी केवळ मुलांनाच नाही, तर सर्व वयोगटांच्या, लहान-थोर माणसांना अनेक प्रकारे आनंद देतील अशाच आहेत.